कमी पैशातही दर्जेदार नाटक करता येते   

अभिनेते पीयूष मिश्रा यांचे मत; रंगभूमीवर पैसा नकोच 

पुणे : भारतीय रंगभूमीवर पैसे नाहीत, अशी कायमची तक्रार आहे. त्यात तथ्य आहे; मात्र रंगभूमीवर कालही पैसे नव्हते, आजही नाहीत आणि उद्याही नसणार आहेत. तरीही अगदी कमी पैशात नाटक करता येते हे फिरोदिया करंडक स्पर्धेतून शिकायला मिळते. त्यामुळे चांगली नाटके रंगभूमीवर यायची असतील, तर पैसा कधीच येवू नये, अशी भावना अभिनेते पीयूष मिश्रा यांनी मंगळवारी व्यक्त केली. 
 
फिरोदिया करंडक आंतरमहाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीयूष मिश्रा यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाला फिरोदिया समूहाचे अजिंक्य फिरोदिया, एचसीएल फाउंडेशनच्या डॉ. निधी पुंधीर, स्पर्धेचे संयोजक सुर्यकांत कुलकर्णी उपस्थित होते. अभिनेता ओम भूतकर आणि गायिका प्रियांका बर्वे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. मैं पीयूष मिश्रा अशी ओळख मिश्रा यांनी विद्यार्थ्यांना करून दिली अन् आपल्या आवडत्या अभिनेत्याला पाहून विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. मिश्रा यांनी विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव ‘इक बगल में चाँद होगा, इक बगल में रोटियाँ अन् ‘आरंभ है प्रचंड’ ही गाणी सादर केली अन् त्यांच्या गायकीला विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट करत दाद दिली.
 
यंदाच्या ५१ व्या स्पर्धेत सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाने ‘गजाल अशी अप्पूची’ या सादरीकरणाला सांघिक प्रथम क्रमांक पटकावले. एमआयटी अ‍ॅकॅडमी ऑफ इंजीनिअरिंग (आळंदी) या संघाने ’धरतीची आम्ही लेकरे’ या सादरीकरणासाठी सांघिक द्वितीय पटकावला, तर टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या संघाला ‘दास्तान-ए-जहान’ या एकांकिकेला, तर गरवारे वाणिज्य महाविद्यालयाच्या संघाला ‘रामुलम्मा’ या सादरीकरणासाठी विभागून सांघिक तृतीय क्रमांक देण्यात आला. यावेळी विविध विभागातही पारितोषिके देण्यात आली. विजेत्या संघांतील विद्यार्थ्यांनी करंडक हाती घेताच जल्लोष केला. अरे आव्वाज कोणाचा जयघोष विद्यार्थ्यांनी केला अन् विद्यार्थ्यांच्या जल्लोषाने सभागृह दुमदुमून गेले.
 
मिश्रा म्हणाले, भारतामध्ये रंगभूमीसाठी पैसे नाहीत ही मोठी अडचण आहे, ही सगळ्यांचीच तक्रार आहे. नाटक हे पैशासोबत कधीच होऊ शकत नाही, पैशामुळे आज रंगभूमीची अवस्थाच बिघडली आहे. आपल्या देशातील रंगभूमीवर पैशांचा अभाव नेहमीच राहणार आहे. तरीही स्पर्धेच्या माध्यमातून चांगली नाटके समोर येत आहेत. मी १९७९ पासून नाटक करत आहे. फिरोदिया करंडक स्पर्धेतील नाटक पाहून एनएसडीचे दिवस आठवले. एनएसडीमधील विद्यार्थ्यांना स्पर्धांमधील नाटक दाखवायला हवे. आजच्या तरुणाईला नाटकातून त्यांना काहीतरी सिद्ध करायचे आहे. येथे नाटक पाहिल्यानंतर त्याची अनुभूती झाली आणि हा अनुभव खूप छान होता. 
 
सुर्यकांत कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. अजिंक्य फिरोदिया, डॉ. निधी पुंधीर, प्रियांका बर्वे, ओम भूतकर यांनी मनोगत व्यक्त केले. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान पारितोषिक कार्यक्रमाच्या गजाल अशी अप्पूची,  धरतीची आम्ही लेकरं आणि दास्तान-ए-जहान ही विजेत्या संघांची सादरीकरणे झाली, त्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे यश 

फिरोदिया करंडक स्पर्धेत टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘दास्तान-ए-जहान’ या एकांकिकेने नवा विक्रम केला. सांघिक तृतीय क्रमांकांसह वैयक्तीक आठ पारितोषिकांवर मोहोर उमटवली. त्यामुळे पारितोषिक वितरण सोहळ्यात टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या उत्कृष्ठ सादरीकरणाचे मंगळवारी गणेश कला क्रीडा रंगमंच येथे कौतुक झाले. फिरोदिया करंडक स्पर्धेच्या प्रथम फेरीपासूनच टिमविच्या संघाने उत्कृष्ठ सादरीकरण करून रसिकांची मने जिंकली. 
 

Related Articles